गटनेतेपदी एकनाथ पवार; महापौरसाठी नामदेव ढाके?
By admin | Published: March 7, 2017 01:32 AM2017-03-07T01:32:01+5:302017-03-07T01:32:01+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता परिवर्तन करीत भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता परिवर्तन करीत भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. भोसरी मतदार संघातून सत्तारुढ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड जाहीर करण्यात आली असून, चिंचवड मतदार संघातून महापौरपदासाठी नामदेव ढाके यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे इच्छुकांना उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.
महापालिकेचे महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून, १४ मार्चला या पदासाठी निवडणूक होत आहे. सध्या या पदासाठी चार ते पाच जण स्पर्धेत आहेत. नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, केशव घोळवे, नितीन काळजे, आशा शेंडगे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते ही महत्त्वाची पदे देताना विधानसभा मतदारसंघनिहाय संधी देण्याचे सत्ताधाऱ्यांकडून
प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत
आहे. दरम्यान, गटनेते पद भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्याने आता उर्वरित पदे कोणत्या भागाला मिळतात, याबाबत उत्सुकता आहे. पालिकेतील महत्त्वाची पदे मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. (प्रतिनिधी)
माजी शहराध्यक्षाला संधी
भाजपाने एकनाथ पवार यांना संधी दिल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघाला सत्तारूढ पक्षनेतेपद मिळाले आहे. एकनाथ पवार हे प्रभाग क्रमांक ११, कृष्णानगर-कोयनानगर-अजंठानगरमधून निवडून आले आहेत. २००७ मध्ये ते भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होते. पवार यांनी भाजपाचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. एकनाथ पवार यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
जुन्या कार्यकर्त्याला न्याय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा जुना कार्यकर्ता अशी नामदेव ढाके यांची ओळख आहे. औद्योगिकनगरीत कामगार आघाडीत काम करताना प्रदेश पातळीवरही कामाची संधी मिळाली. जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना मेळ साधला.