एकनाथ शिंदे यांना ‘पर्यटन खाते’ही हवे
By Admin | Published: May 16, 2015 03:55 AM2015-05-16T03:55:55+5:302015-05-16T03:55:55+5:30
शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांना फक्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यात काम करण्यास पुरेसा वाव दिसत नसल्याने त्यांना
संदीप प्रधान, मुंबई
शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांना फक्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यात काम करण्यास पुरेसा वाव दिसत नसल्याने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील पर्यटन अथवा बंदरे या खात्याचा कार्यभारही हवा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी आपली ही इच्छा त्यांच्या कानावर घातल्याचे कळते.
सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सार्वजनिक उपक्रमाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने या खात्यात फारसे काम नाही. शिवाय आपण शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते असल्याने आपल्याला महत्त्वाचे खाते मिळाले पाहिजे, असा शिंदे यांचा आग्रह आहे. राज्य सरकारमधील काही मातब्बर मंत्री व नोकरशहा यांच्यात सध्या कुरबुरी सुरू असताना शिंदे यांच्या मागणीवरून नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यात गेली काही वर्षे आपण प्रभावशाली कामगिरी केली असल्याकडे शिंदे यांनी पक्षप्रमुखांचे लक्ष वेधले. २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचे २ खासदार आणि ७ आमदार निवडून आणण्याकरिता प्रयत्न केले असल्याकडे लक्ष वेधत शिंदे यांनी पक्षाने चांगल्या खात्याकरिता आपल्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.