Bacchu Kadu: शिंदे-फडणवीस फेविकॉलपेक्षा मजबूत जोड, बच्चू कडूंचं विधान; कोणतं मंत्रीपद हवं तेही सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:35 AM2022-07-06T11:35:26+5:302022-07-06T11:36:45+5:30
राज्यात शिंदे आणि फडणवीसांच्या रुपात स्थापन झालेलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून येत्या काळात सरकारकडून चांगली कामं होतील असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई-
राज्यात शिंदे आणि फडणवीसांच्या रुपात स्थापन झालेलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून येत्या काळात सरकारकडून चांगली कामं होतील असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी शिंदे सरकारवर कौतुकाचा वर्षाव तर केलाच त्यासोबत शिंदे गटात सामील होण्यामागचं कारणही सांगितलं.
राष्ट्रवादीकडून मतदार संघात निधी मिळत नव्हता. शेवटी जनतेची काम करत असताना तुम्ही मंत्री असलात तरी तुमचा मतदार संघच तुमच्यासाठी महत्वाचा असतो. एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता, असं बच्चू कडू म्हणाले.
"शिंदे आणि फडणवीस फेविकॉलपेक्षा मजबूत जोड आहे. सरकार कोसळणार असं सांगण हे विरोधकांचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही", असंही बच्चू कडू म्हणाले.
दिव्यांगांसाठी काम करण्याची इच्छा
शिंदे सरकारमध्ये कोणतं मंत्रीपद मिळणार याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाली आहे का? असं विचारलं असता बच्चू कडू यांनी मंत्रिपदापेक्षा मतदार संघातील विकास महत्वाचा असतो असं म्हटलं. तसंच माझ्यासाठी दिव्यांगांचा विषय महत्वाचा आहे. कुणाला कोणतं मंत्रिपद मिळतंय याकडे लक्ष देत नाही. दिव्यांगांसाठी वेगळा विभाग बनवून त्याचा चार्ज जर माझ्याकडे दिला तर नक्कीच त्यासाठी चांगलं काम करता येईल, अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
शिंदे किंतू परंतू न ठेवता प्रेम करणारा माणूस
"एकनाथ शिंदेंना कोण काय म्हणतंय यात लक्ष देण्यासारखं काहीच नाही. कारण त्यांना रिक्षावाला वगैरे म्हणणं हे त्यांना देखील वाईट वाटणार नाही. शिंदे किंतू परंतू न ठेवता प्रेम करणारा माणूस आहे. आम्ही सुद्धा शेतकरी, दूध वाटणारे आहोत. आता दूध वाटणारा म्हणण्यात वाईट काय आहे? कोणतंही काम वाईट नसतं. तुम्ही सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करत असता आणि हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे असं जनतेला वाटणं हेच अधिक महत्वाचं आहे", असं बच्चू कडू म्हणाले.