Eknath Shinde : रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 01:50 PM2022-08-01T13:50:20+5:302022-08-01T13:51:14+5:30
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ईडीचे अधिकारी राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील मैत्री बंगल्यावर झाडाझडतीसाठी पोहोचले होते. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ते औरंगाबाद जिल्हा दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करत होते.
नेमकं काय म्हणाले शिंदे? -
संजय राऊतांना टोला लगावताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आवाज योतोय...? (जनतेतून आवाज - हो...) पुन्हा शिंदे म्हणाले, अरे तो भोंगा नीट करानारे बाबा… एक भोंगा गेला तिकडे आत... शिंदे यांनी पुन्हा विचारले, अरे आवाज योतो काय...? (जनतेतून आवाज - येतोय येतोय…), यावर पुन्हा शिंदे म्हणाले, अरे आता येणारच नाही, तो 8 वाजताचा भोंगा बंद झालाय." यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
या दौऱ्यादरम्यान, "संजय राऊत यांचे काय होईल? मला माहिती नाही. पण ते म्हणालेच आहेत ना, की कर नाही त्याला डर कशाला? यामुळे चौकशी होऊन जाऊ द्या. महाविकास आघाडीतील ते मोठे नेते होते. ईडीला घाबरून भाजपकडे जाणार नाही, असे ते म्हणत आहेत. त्यांना कुणीही बोलावलेले नाही. ईडीच्या कारवाईने कुणी आमच्याकडे येत असेल तर, म्हणजे शिवसेना-भाजपकडे येऊ नका. अर्जुन खोतकर किंवा अन्य कुणीही, ईडीला घाबरून येऊ नका, हे पुण्याचे काम करू नका. केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वीही तपास केलेले आहेत. चुकीचा तपास केला असता तर न्यायालयाने संबंधितांना दिलासा दिला असता, " असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एवढेच नाही, तर आमच्याकडे आलेल्या आमदार, खासदारांपैकी एकाने तरी ईडीच्या कारवाईमुळे आल्याचे सांगितले का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेना फोडण्याचं पाप राऊतांनी केलं -
संजय राऊतांच्या अटकेसंदर्भात बोलताना शिंदे गटाती आमदार संजय शिरसाट म्हणाले, "काल ईडीच्या कारवाईवेळी संजय राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही झाली. परंतु, अशा अविर्भावात ते वागले नाहीत. संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची ही फळे आहेत. संजय राऊत हा त्यांचा प्यादा होता, या प्यादाचे काम आता संपले आहे. शिवसेना फोडण्याचे काम राऊतांनी केले. संजय राऊत शिवसेनेसोबत होते की राष्ट्रवादीसोबत होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होते, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.