Eknath Shinde Shivsena Symbol: शिंदे गटाचे चिन्ह ठरले? ठाकरेंची मशाल धगधगणार, शिंदेंचा सूर्य तळपणार; थोड्याच वेळात घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:47 AM2022-10-11T10:47:13+5:302022-10-11T11:01:43+5:30
Eknath Shinde Balasahebanchi Shivsena sign: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले पण त्यांनी सुचविलेली तिन्ही चिन्हे नाकारण्यात आली होती.
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहे. यातच काही काळासाठी निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वाटून दिले आहे. यानुसार सोमवारी ठाकरे गटाला मशाल दिली होती. तर शिंदे गटाकडे चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले होते. यावर शिंदे गटाचे चिन्ह फायनल झाल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे असणार आहे. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले होते. आज निवडणूक आयोगाने शिंदे गटाला तळपत्या सुर्याचे चिन्ह देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी एबीपी माझाला सांगितले. या चिन्हाची थोड्याच वेळात घोषणा होणार असल्याचेही सांगण्य़ात आले आहे. आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हा पर्याय पाठवला आहे.
‘धगधगती मशाल’वर असा झाला निर्णय
ठाकरे गटाची पहिली पसंती त्रिशूल होते, तर दुसरे उगवता सूर्य होते. याच चिन्हांवर शिंदे गटानेही दावा केला होता. यामुळे हे दोन्ही चिन्ह त्यांना मिळाले नाही. तिसरे चिन्ह धगधगती मशाल होते. हे चिन्हसुद्धा यापूर्वी दुसऱ्या समता पक्षाला दिले होते. परंतु या पक्षाचे अस्तित्व नसल्यामुळे आता ते मुक्त चिन्हांमध्ये आल्याने ते ठाकरे गटाला दिले आहे. परंतु हे चिन्ह केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरते आहे. आयोगासमोर सुरू असलेल्या निवाड्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले आहे.
धार्मिक कारणांनी चिन्ह नाकारले
ठाकरे गटाने त्रिशूल व शिंदे गटाने त्रिशूल व गदा या चिन्हांवर दावा केला होता. परंतु या चिन्हांना धार्मिक संदर्भ असल्याने हे चिन्ह प्रदान केले नाही, असे आयाेगाने स्पष्ट केले. उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडूतील डीएमकेचे असल्याने ते चिन्ह नाकारण्यात आले. यामुळे शिंदे गटाची तिन्ही चिन्हे आयोगाने नाकारली होती. आता उगवत्या सूर्याऐवजी उगवलेला सूर्य शिंदे गटाला देण्यात येणार आहे.
दाेन्ही गटांचा दुसरा पसंतीक्रम मान्य
दोन्ही गटांना पहिल्या प्राधान्याचे नाव पक्षाला मिळाले नाही. शिंदे गटाने पहिले प्राधान्य शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाला दिले होते, तर दुसरा प्राधान्यक्रम बाळासाहेबांची शिवसेना असा दिला हाेता. निवडणूक आयोगाने दुसरा पसंतीक्रम मान्य केला. उद्धव ठाकरे गटाने पहिले प्राधान्य शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असे दिले होते. दोन्ही गटांनी एकाच नावावर दावा केल्याने निवडणूक आयोगाने हा दावा फेटाळून लावला व दुसऱ्या प्राधान्य क्रमावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव होते.