Eknath Shinde : 'बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले; तुम्ही संपत्तीचे अन् आम्ही विचारांचे वारसदार'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:45 PM2023-03-19T20:45:25+5:302023-03-19T20:49:14+5:30
'बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण आमची संपत्ती आहे.'
खेड: खेडच्या गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी याच मैदानातून शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला शिदेंनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांनी ज्या लोकांना आपल्या जवळ केले नाही, तुम्ही अशा लोकांना जवळ केले. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस देशाचा पंतप्रधान करा, कलम 370 हटवतो. राम मंदिर बांधण्याचे स्वप्न बाळासाहेबांचे होते. आज राम मंदिरही बांधले जात आहे आणि कलम 370 हटवली गेली. बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले,' असे शिंदे म्हणाले.
तुम्ही संपत्तीचे तर आम्ही विचारांचे वारसदार
ते पुढे म्हणतात, काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, या काँग्रेसला कधीही जवळ करू नका, असे बाळासाहेब म्हणायचे. हा बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची भूमिका होती. तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार सांगता, तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात. आम्ही विचारांचे वारसदार आहोत. आम्हाला तुमची संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार, हीच आमची संपत्ती आहे. आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाले, हीच आमची संपत्ती आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधीही जवळ केले नाही, अशा लोकांना तुम्ही जवळ केले.
तुम्ही सत्तेच्या मोहासाठी त्यांच्यासोबत गेला
जो व्यक्ती आपल्या पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो. जो राज्य जिंकू शकत नाही, तो पंतप्रधान कसा होऊ शकतो. अशा लोकांसाठी बाळासाहेबांचा मुलगा आणि नातू मत मागतो. अशी परिस्थिती तुम्ही राज्यात आणली. कशासाठी? सत्तेसाठी, खुर्चीसाठी...तुम्ही म्हणाला होतात की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू. पण, तुम्हाला सत्तेचा मोह झाला. आम्हाला आनंद वाटला. पण, नंतर तुम्ही हिंदुत्वाबद्दल मूक गिळून गप्प बसू लागलात. तुम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायलाही जीभ कचरू लागली. पूर्वी तुमचे सोनिया गांधी आणि शरद पवारांबद्दल काय विचार होते, हे सगळ्यांना माहित आहे. 2019 मध्ये काय झालं? सगळं जुनं विसरून गेलात.
अशोक चव्हाणांनी शेण खाल्ल, तुम्हीही...
अशोक चव्हाणांनी शेण खाल्ल असं तुम्ही म्हणाला होता. आज तुम्ही त्यांच्या पंगतीत बसून तेच शेण खात आहात. मीडियाला बाईट देताना अजित पवारांनी डोळा मारला. जे आज गळ्यात हात घालत आहेत, ते उद्या तुमचा गळा दाबतील. तुम्ही आम्हाला मिंध्ये म्हणता...हा एकनाथ शिंदे वफादार आहे. हा एकनाथ शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे. बैमानी माझ्या रक्तात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंध्या होणार नाही.