कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:25 IST2025-04-22T06:24:50+5:302025-04-22T06:25:27+5:30
उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर फिरू लागले. तरीही खरी शिवसेना म्हणून जनतेने शिंदेंच्याच पारड्यात आशीर्वाद दिले, असे संदेशात म्हटले

कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
ब्रँड आणि ब्रँडिंग
स्वतःचा ब्रॅण्ड स्वतः तयार करायचा, स्वतःला सामान्य समजणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अग्रगण्य ब्रँड आहेत असे संदेश शिंदेसैनिकांकडून व्हायरल झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी शिंदेंना सत्तेतील ५० आमदार, १२ खासदार येऊन मिळाले. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात न भूतो न भविष्यती असे काम झाले, असा दावा शिंदेसैनिकांनी संदेशात केला. त्यांच्या कार्याचा झपाटा बघून उद्धव ठाकरे घर सोडून बाहेर फिरू लागले. तरीही खरी शिवसेना म्हणून जनतेने शिंदेंच्याच पारड्यात आशीर्वाद दिले, असे संदेशात म्हटले. ठाकरे ब्रँड मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडनेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू केल्याची कुजबुज आहे.
तक्रारींचे असेही मिळते फळ
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नवी मुंबईत अनेक जण शिंदेसेनेच्या दावणीला गेले. निष्ठावंत उद्धवसेनेतच राहिले. गणेश नाईकांची सत्ता असलेली नवी मुंबई पालिका काबीज करण्यासाठी उद्धवसेनेतील जे गळाला लागले नाहीत त्यांच्याविराेधात जे गळाला लागले त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्रीवर तक्रारी केल्या. आधीच याची कुणकुण लागल्याने ज्यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला त्याच विठ्ठल मोरे, एम. के. मढवीसारख्या नेत्यांना मातोश्रीने उपनेतेसारखी पदे दिली. यामुळे तक्रारी असूनही ज्यांच्याकडून फायदा आहे, त्यांना कामाचे असेही फळ मिळते, अशी चर्चा आहे.
घरातच बुरूज ढासळतोय
रायगड जिल्हा आणि शेकाप हे एक समीकरण म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जात होते. मात्र, रायगड जिल्ह्यातून शेकापचे अतित्वच नष्ट होण्याची वेळ पक्षावर आली आहे. जिल्ह्यात सातपैकी एकाही मतदारसंघात शेकापचा आमदार नाही. त्यातच पक्षातील एकामागून एक नेते पक्षाला सोडून जात आहेत. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंडित पाटील यांनी पक्षनेतृत्वात टीका केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अर्थात घरातच शेकापचा बुरूज ढासळत चालल्याची कुजबुज रायगड जिल्ह्यात सुरू आहे.
ठाणेकरांचे जिंकले मन
विरोधकांना आपलेसे करण्याचे कसब खा. नरेश म्हस्के यांच्याकडे आहे. बोरीवली टनेलच्या बैठकीवेळी म्हस्के यांनी नागरिकांना अपेक्षित असलेला मुद्दा डावलून दुसऱ्या मुद्याला हात घालताच नागरिक संतप्त झाले होते. परंतु, काही क्षणातच जे नागरिक संतप्त झाले होते त्याच नागरिकांनी म्हस्के यांच्या बाजूने टाळ्या वाजवल्या. मी तुमच्यातलाच आहे, मी परका नाही, इतर सर्वजण साथ सोडून जातील, किंबहुना सोडून गेले आहेत. तुमची समस्या सोडविण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रयत्न असणार आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांवर भुरळच पाडली. ठाणेकरांचे मन जिंकण्याचे म्हस्के यांचे कसब पाहण्यास मिळाले.