Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिपदावर शहाजी बापूंनी गुवाहाटीची आठवण करून दिली; एकनाथ शिंदेंना म्हणालो होतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 10:01 AM2022-08-09T10:01:30+5:302022-08-09T10:02:03+5:30
Eknath Shinde Cabinet Expansion Shahaji Bapu Patil: सह्याद्री अतिथीगृहावर जाताना शहाजी बापूंना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आमदारांना गुवाहाटीची आठवण करून दिली.
शिंदे गटातून काही नावे ठरत नसल्याने सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे समर्थक आमदारांची बैठक बोलविण्यात आली आहे. असे असताना अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्रिपद घेणारच असे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यातच आता शिंदेंच्या बंडावेळी चर्चेत आलेल्या शहाजी बापू पाटलांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Eknath Shinde Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्यांची नावे ठरेनात; या चार नावांवर 'वाद' सुरु
काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, एकदम ओक्केच... या डायलॉगमुळे शहाजी बापू प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर जाताना शहाजी बापूंना मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आमदारांना गुवाहाटीची आठवण करून दिली.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना मंत्रिपदे देतायत, हे चांगले आहे. गुवाहाटीला जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असा शब्द त्यांना आम्ही सर्व आमदारांनी दिला होता. तसे अधिकार त्यांना दिले होते. यामुळे मंत्रिपद वाटपाचा अधिकारही त्यांना आहे. शिंदे जो निर्णय घेतील, ज्याला मंत्रिपद देतील ते आम्हाला मान्य असल्याचे शहाजी बापू पाटलांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे गटातील 50 आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.
भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे सहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती रात्री उशिरा समोर आली होती. परंतू, शिंदे गटात अस्वस्थता असल्याने शिंदे गटाचे ९ जण शपथ घेण्याची शक्यता आहे. परंतू, अद्याप शिंदे गटात मंत्रिपद कोणाला मिळणार याची यादी निश्चित झालेली नाही. यामुळे शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्व आमदारांना एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत.