Eknath Shinde Cabinet Expansion Update: मंत्रिमंडळाचे खातेवाटप ठरले? थोड्याच वेळात यादी राजभवनाला पाठविणार; कोणाचे 'उद्योग' ते कळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:19 PM2022-08-14T14:19:27+5:302022-08-14T14:19:58+5:30
मलईदार खात्यासाठी तर सारेच मंत्री 'अर्ज' करणार आहेत. महसूल, अर्थ, सा. बांधकाम ही खाती तर सर्वांनाच आवडीची असणार आहेत. यामुळे १८ पैकी १८ आमदारांची पहिली पसंती या खात्यांना असली तर नवल वाटायला नको.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या ४० दिवसांपासून रखडला होता. अखेर हा विस्तार ८ ऑगस्टला करण्यात आला, मात्र १८ मंत्र्यांना शपथ दिली तरी देखील मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले नव्हते. आज अखेर स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी खातेवाटप निश्चित झाल्याचे समजते आहे.
Eknath Shinde: काय तो बंगला, काय ते मंत्रिपद, तुम्हीच सांगा; शिंदे-फडणवीसांचे धक्कातंत्र; मंत्र्यांकडेच 2-3 पर्याय मागितले
भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष खाते वाटप आणि बंगले वाटपावर लागले आहे. मात्र, यातही मंत्र्यांमध्ये रुसवे फुगवे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तुम्हाला कोणते मंत्रिमंडळ आणि बंगला हवा आहे, असे विचारत दोन-तीन पर्याय मागितले होते. यावर आता शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ वाटप केले आहे.
उर्जा आणि उद्योग खात्यावरून भाजपा आणि शिंदे गटामध्ये तिढा होता, आता हा तिढा सुटल्याचे समजते आहे. यामुळे ही खाती कोणाकडे जातात याकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी ही यादी थोड्याच वेळात राजभवनाला पाठविण्यात येणार आहे. यामध्ये काही मंत्र्यांबाबत धक्कातंत्राचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मंत्र्यांना त्यांच्या आवडीची खाती मिळालेली नाहीत. सायंकाळपर्यंत कोणत्या मंत्र्याला कोणते खाते देण्यात आलेय, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पर्याय मागितलेले तरी...
मलईदार खात्यासाठी तर सारेच मंत्री 'अर्ज' करणार आहेत. महसूल, अर्थ, सा. बांधकाम ही खाती तर सर्वांनाच आवडीची असणार आहेत. यामुळे १८ पैकी १८ आमदारांची पहिली पसंती या खात्यांना असली तर नवल वाटायला नको. यामुळे मंत्रिपद वाटपावरून नाराजी नको म्हणून शिंदे फडणवीसांनी जरी मंत्र्यांना दोन तीन पर्याय देण्याचे म्हटले असले तरी त्यातून कोणाला कोणते खाते द्यायचे हे निवडणे या दोघांना कठीण जाणार आहे. गृह खात्यावरून तर शिंदे- फडणवीसांमध्येच स्पर्धा रंगली आहे. यामुळे हे खाते भाजपाकडे की शिंदे गटाकडे हे देखील महत्वाचे असणार आहे. विखे पाटील सर्वात ज्येष्ठ असल्याने त्यांना मोठे खाते मिळेल. पण भाजपाच्या अन्य मंत्र्यांना कोणते खाते हवेय? त्यांना महत्वाची खाती मिळाली तर शिंदे गटाला परवडणार आहे का? मग ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसकडे ही खाती होतीच की, शिवसेनेच्या हाती पुन्हा भोपळा अशीच गत या शिंदे गटाची होणार आहे. फक्त हिंदुत्ववादी एवढाच काय तो फायदा त्यांना होणार आहे.