Eknath Shinde on Sanjay Rathod: संजय राठोडांना मंत्रिपद का दिले? एकनाथ शिंदेंनी दिले कारण, कोणीही नाराज नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:36 PM2022-08-09T12:36:47+5:302022-08-09T12:37:15+5:30
Eknath Shinde Cabinet Expansion: संजय राठोड यांच्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कठोर टीका केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून रखडलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज झाला. यामध्ये शिंदे यांनी भाजपाची पुरती कोंडी केली आहे. ज्या संजय राठोडांविरोधात राळ उठवून उद्धव ठाकरेंना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यास भाग पाडले होते, तेच राठोड शिंदेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कठोर टीका केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
"पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर अजित पवारांनी ज्यांना क्लिन चिट मिळालेली नाही त्यांना शिदेंनी मंत्रीमंडळात घेणे टाळायला हवे होते, अशी प्रतिक्रिया दिली होती.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. ज्यांना पोलिसांनी क्लिन चिट दिलीय त्यांनाच मंत्रिमंडळात घेतले आहे. संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे. यामुळे त्यांना मंत्री केले. जर कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे शिंदे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.
तसेच संजय शिरसाट यांच्या नाराजीवर त्यांनी ते नाराज नसल्याचे सांगितले. आमची भूमिका सर्वसमावेशक आहे. पुढेही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ही एक प्रक्रिया आहे. यामुळे कोणी नाराज नाही. संजय शिरसाट शपथविधी कार्यक्रमाला आले होते, पुढे बसले होते. आम्ही काम करून उत्तर देणार. सरकार लोकाभिमुख आहे, असा खुलासा शिंदे यांनी शिरसाट यांच्यासोबतच्या कथित वादावर केला.