Maharashtra Political Crisis: बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी शिंदे गटातील आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:03 PM2022-07-07T18:03:36+5:302022-07-07T18:04:19+5:30

"गुलाबराव पाटलांनी १० जन्म घेतले तरी उद्धव ठाकरेंचे उपकार फेडू शकणार नाहीत"; असं विधान ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटातील आमदाराने केल्याचा दावा केला जात आहे.

Eknath Shinde Camp Shivsena MLAs audio clip viral claiming chimanrao patil criticizing gulabrao patil uddhav thackeray | Maharashtra Political Crisis: बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी शिंदे गटातील आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

Maharashtra Political Crisis: बंडखोरांमध्येही फूट? गुलाबराव पाटलांवर टीका करणारी शिंदे गटातील आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील ऐतिहासिक (Revolt in Shivsena) बंडानंतर अखेर जून महिन्याच्या अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाले. आज मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. आता पुढचा टप्पा कोणाला किती मंत्रीपदं मिळणार हा आहे. ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांबाबत (Eknath Shinde Camp) सुनावणी होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल अशी चर्चा आहे. मंत्रीपदावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे. पण त्याआधीच, बंडखोर आमदारांमध्ये फूट पडली आहे की काय अशी शंका उत्पन्न करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

एकनाथ शिंदे गटात थोडी अंतर्गत धुसफुस असल्याचा प्रकार नुकताच समोर आला असल्याचे सांगितले जात आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा जळगावमधील शिवसेनेचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांचा आणि एका शिवसैनिकाचा असल्याचा दावा केला जात आहे. या दोघांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका केल्याचे दिसतंय. "उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देऊनही गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे गटासोबत कसे आले ते माहिती नाही. पण गुलाबराव पाटील यांनी १० जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर केलेले उपकार त्यांना फेडता येणे शक्य नाही", असे या ऑडिओ क्लिपमधील आमदार चिमणराव पाटील बोलत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे गटात अंतर्गत वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑडिओ क्लीपमधील संभाषणात काही धक्कादायक विधाने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. "गुलाबराव पाटील यांनीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली. गुलाबराव पाटील यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. मी शिवसेनेतून बाहेर कसा जाईन यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. मी भिकाऱ्यासारखं पक्षश्रेष्ठींच्या पाठिमागे फिरत राहिलो, पण माझ्या पदरी निराशाच पडली. मी अनेकदा न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मी एकनाथ शिंदे गटासोबत गेलो", असे त्या व्हिडीओ क्लिपमध्ये म्हटलं गेलं असून तो आवाज चिमणराव पाटील यांचाच असल्याचा दावा केला जात आहे.

गुलाबराव पाटील यांच्याकडून माझ्यावर खूप अन्याय झाला. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावरही घातला होता. मी २९ वर्षे शिवसेनेत आहे. या काळात माझ्याकडून एकतरी चूक झाली का, असा सवालही मी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. मात्र, त्यानंतरही गुलाबराव पाटलांकडून माझ्यावर होणार अन्याय सुरुच राहिला. मी खूप वाईट गोष्टी सहन केल्या. गुलाबराव पाटील माझ्याविरोधात पोलिसांना फोन करायचे. त्यांच्या जाचाला कंटाळूनच मी बाहेर पडलो, असेही क्लिपमध्ये सांगण्यात आले आहे.

Web Title: Eknath Shinde Camp Shivsena MLAs audio clip viral claiming chimanrao patil criticizing gulabrao patil uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.