एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 08:19 AM2024-11-30T08:19:27+5:302024-11-30T08:21:25+5:30
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे.
Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला निर्विवाद यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्रिपद आणि खातेवाटपावरून तिढा निर्माण झाल्याने अद्याप नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं, याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपदासह इतर काही मंत्रिपदांचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र गृहखातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याचे समजते. शिंदे यांची हीच अट भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जात आहे.
महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्रिपद आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृहखात्याची धुरा होती. हाच फॉर्म्युला कायम ठेवत मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात आपल्याला गृहखातं मिळावं, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्याची आल्याची माहिती आहे. मात्र पाच वर्ष सरकार सुरळीत चालवायचं असल्यास गृहमंत्रिपद दुसऱ्या पक्षाला देऊन जमणार नाही, असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याचे समजते. त्यामुळेच अद्याप भाजपने शिंदे यांची गृहखात्याची मागणी मान्य केलेली नाही. परिणामी सत्तास्थापनेला विलंब होत असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विश्रांतीसाठी त्यांच्या दरे या मूळ गावी गेले आहेत. वाटाघाटींमध्ये भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज होऊनच शिंदे यांनी गाव गाठल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे.
एकनाथ शिंदे मुंबईत कधी परतणार?
सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्याबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी मुंबईत परतलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सातारला रवाना झाले. साताऱ्यातील आपल्या दरे या गावी ते दोन दिवस आराम करण्यासाठी गेले आहेत. महायुतीत आपण नाराज नसून आराम करण्यासाठीच आपण गावी जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता होती. परंतु, शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली. एकनाथ शिंदे हे दोन दिवस सातारला राहणार असून ते १ किंवा २ डिसेंबरला मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे महायुतीची पुढील बैठक त्यानंतरच होण्याची शक्यता आहे.