जीवाचं बरं-वाईट झाल्यास जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारची, सुरक्षा काढल्यानंतर मिटकरींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 08:03 AM2022-10-30T08:03:47+5:302022-10-30T08:04:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना नागपूर विभागाकडून एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना नागपूर विभागाकडून एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु त्यांची सुरक्षा काढण्यात आल्याचं त्यांना फोनद्वारे सांगण्यात आल्याची माहिती मिटकरी यांनी दिली. नागपूर विभागाच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटनं फोन करून सुरक्षा काढण्यात आल्याचं सांगितलं असंही ते म्हणाले.
“गेल्या काही महिन्यांपूर्वी मला काही गोष्टी संशयास्पद आढळल्या. त्यानंतर मी रितसर अर्ज केला आणि वळसे-पाटील गृहमंत्री असताना गृहविभागाने त्यावर तात्काळ अंमलबजावणी करत मला तात्काळ एक्स दर्जाची सुरक्षा दिली. ही सुविधा नागपूर विभागाकडून पुरवण्यात आली होती. मात्र देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आणि शिंदे सरकार सत्तेत आलं त्यानंतर अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली,” असं मिटकरी म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“आम्ही लोकांमध्ये फिरणारे आहोत. आम्हाला कधीही सुरक्षेची गरज वाटली नाही आणि आताही ती नाही. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम आहे. पण नागपूर विभागातील स्पेशल डिपार्टमेंट आहे तिथून फोन आला आणि सुरक्षा काढण्यात आल्याचं सांगितलं. तेथील एपीआयना फोन करून विचारलं आणि एटीएसकडून तसं पत्र आलं असेल तर ते दाखवा असं त्यांना सांगितलं. त्यांनी ते दाखवण्यास नकार दिला,” असंही ते म्हणाले.
राजकारण कशाप्रकारे सुरू आहे, शिंदे गटाच्या आमदारांना एक्स प्लस, व्हाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, रवी राणांना विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यांना का सुरक्षा पुरवली गेली आणि आमची सुरक्षा का काढली गेली याची गृहविभागानं एकदा माहिती द्यावी. सुरूवातीपासून मी एका प्रवृत्तीविरुद्ध लढणारा माणूस आहे. या देशाला ज्या जात्यांध प्रवृत्तीनं सामाजिक सलोखा बिघडवला, त्यांच्याविरोधात आम्ही बोलत आहोत. जर आमच्या जीवाला काही धोका झाला, तर यासाठी शिंदे सरकार जबाबदार राहिल. त्यांनी याची जबाबदारी घ्यावी. जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असेल, असंही मिटकरी म्हणाले.