एकनाथ शिंदे असे बोललेच नव्हते; केसरकरांचा 'गोळी झाडण्याचा' दावा भुमरेंनी फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:23 PM2023-06-22T13:23:45+5:302023-06-22T13:38:14+5:30
उद्धव ठाकरे आता भाषण करून मातोश्रीत जाऊन बसले आहेत. आता ते सहा महिने बाहेर येत नाहीत. - भुमरे
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या समोरच विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करून प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर आता शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांनी भाष्य केले आहे. याचबरोबर भुमरे यांनी सहकारी मंत्री दीपक केसरकर यांचा एकनाथ शिंदे गोळी झाडून घेणार होते, हा दावा फेटाळला आहे.
सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षनेते पद सोडून संघटनेत काम करण्यास इच्छुक असतील. त्यांची पोटातील नाराजी ओठांवर आली असा टोला भुमरे यांनी लगावला. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते.
उद्धव ठाकरे आता भाषण करून मातोश्रीत जाऊन बसले आहेत. आता ते सहा महिने बाहेर येत नाहीत. लोक भेटायला मातोश्री बाहेर गेले तर एक - एक महिना आतून निरोप येत नाही. त्यामुळे त्यामुळे २०२४ साली उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि १ ते २ लोक राहतील, अशी टीका भुमरे यांनी लगावली.
राज्यामध्ये अधिकारी यांच्या बदल्यांबाबत माझ्यावर आरोप होत आहेत. पण माझ्या खात्याकडे आस्थापना नाही. मला एका शिपायाची बदली देखील करता येत नाही. मला उसनवारीवर अधिकारी घ्यावे लागतात. त्यामुळे अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप भुमरे यांनी केला.
एकनाथ शिंदेंनी गोी झाडून घेतली असती, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. यावर भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी सत्तांतरवेळी शिंदें सोबत यांच्या सोबत होतो. शिंदे हे हलक्या मनाचे नाहीत. ते रडणारे नव्हेत, लढणारे आहेत. ते असे म्हणाले नव्हते, असा दावा भुमरे यांनी केला आहे.