एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण नको, कधीही प्रयत्न नाही; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 03:55 PM2022-07-08T15:55:03+5:302022-07-08T15:55:44+5:30
उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही, असे माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत म्हणाले.
प्रत्येक निवडणूक ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊनच आम्ही लढत असतो. एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचविण्यासाठी घेतलेला आहे. त्यांनी कधीही शिवसेनेवर टीका केलेली नाही, कधीही धनुष्यबाण स्वत:ला मिळावा म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. कुठेही निशानी घेण्याचा संबंध जोडण्यात येऊ नये. जनतेमध्ये संभ्रम राहू नये, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर आली आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणत्याही वक्तव्य केल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाने त्यावर बोलणे उचित नाही. ठाकरे कुटुंबावर ज्या काही टीका झाल्या त्या आनंददायी होत्या असे नाही. काल परवाच्या बैठकीत आम्ही त्यावर बोललो आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेबांच्या कुटुंबावर टीका होऊ नये, एवढा त्यांचा आदर राखला जावा, असे आम्हाला सांगितले होते. आम्ही त्यांना तुमचा एखादा नेता असे बोलतोय हे निश्चित सांगू, असेही उदय सामंत म्हणाले.
मातोश्रीचे दरवाजे उघडल्यावर त्यांनी आदित्य ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भेटत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. तसेच मंत्री पदावरून मी माझ्या वैयक्तिक कामांत होतो, मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि परत मुंबई असा फेरा झाला. माझ्यावर महाराष्ट्राच्या सेवेची एखादी जबाबदारी टाकली तर मी ती निश्चितपणे पार पाडेन असे उदय सामंत म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणालेले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. "ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आदर वाटत आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना लगावला.
"धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले.