Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, सोबत असलेल्या आमदारांसोबत एकत्र फोटोसेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:05 AM2022-06-22T06:05:56+5:302022-06-22T06:09:29+5:30
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
सूरत - एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कालपासून सूरत येथे असलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काढलेला फोटो समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३३ आणि बच्चू कडू व त्यांचे समर्थक असलेले एक आमदार आणि इतर एक आमदार असे मिळून ३६ आमदार आहेत.
दरम्यान, गुवाहाटीकडे रवाना होताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसैनिकांनी कुठलंही बंड केलेलं नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणार नाही. तसेच कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची शिकवण याच्यासोबत आम्ही कधीही फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.