उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 08:48 PM2024-10-06T20:48:11+5:302024-10-06T20:50:12+5:30
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.
Eknath Shinde ( Marathi News ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव दिपेश म्हात्रे यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे पितापुत्रावर टीकास्त्र सोडलं आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा 'कारटं' असा उल्लेख केला. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा. हिऱ्यापोटी गारगोटी नेहमी म्हणतो तेच उदाहरण आहे ,” असा हल्लाबोल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना केला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना आम्ही उत्तर देणार नाही. आम्ही कामातूनच उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते बिथरले आहेत,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला असून मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वरुण सरदेसाई, कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.