शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:18 PM2023-07-19T22:18:31+5:302023-07-19T22:19:54+5:30
#LokmatRainUpdates कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण कोकण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार शाळा, कॉलेज बंद ठेवण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा आदेश शिंदे यांनी दिला आहे.
शिंदे यांनी २० जुलै, २०२३ रोजी अनुक्रमे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळविण्यास सांगितले आहे.
शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये याची कल्पना देऊ शकेल. त्याबाबतचा अहवालही शासनास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.