Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार, कोण-कोण होणार मंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 09:20 AM2022-07-17T09:20:32+5:302022-07-17T09:22:49+5:30
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत.
मुंबई-
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. यातील पहिला टप्पा येत्या काही दिवसात होईल आणि यात १० ते १२ मंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर! १५ आमदार फोडणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार?
विधानसभा अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा होईल. २० जुलै रोजी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जेणेकरुन नव्या मंत्र्यांना विधानसभा अधिवेशनाच्या तयारीसाठी काही दिवस हातात मिळतील. पहिल्या टप्प्यात नेमकं कोण-कोणत्या आमदारांना संधी मिळते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांची मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत संबोधित करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे संकेत दिले आहेत. पहिल्या टप्प्यात महत्वाच्या १० ते १२ खात्यांसाठी मंत्री नेमले जातील. यासाठी शिंदे गट आणि भाजपामधील महत्वाच्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल अशी माहिती समोर आली आहे.