Maharashtra Politics: “शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 09:17 PM2022-10-15T21:17:29+5:302022-10-15T21:22:34+5:30
उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनायचे होते. पण, सर्वांत मोठी अडचण राज ठाकरेंची होती. म्हणून मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत गेम केला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, दौरे, सभा यांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला वाढता पाठिंबा उद्धव ठाकरेंसाठी आव्हान ठरत असल्याचे सांगितले जात आहे. यातच शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला, असा मोठा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे.
बुलढाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर सडकून टीका केली. भाजप आणि शिवसेना म्हणून निवडणूक लढवली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. आता उद्धव ठाकरे म्हणतात की, अडीच वर्षाचा मुख्यमंत्री करायचे ठरले होते. शिवसेना भाजप यांची सभा एकत्र व्हायची आणि तेथे व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस म्हणायचे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन तेव्हा उद्धव ठाकरे काही बोलायचे नाहीत, असे सांगत गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता
१९९७ पासून हे सर्व षड्यंत्र सुरू झाले. बाळासाहेबांना दहशतवाद्यांच्या धमक्या येत असल्याने झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. यामुळे त्यांच्या भेटी गाठी कमी झाल्या तेव्हा उद्धव ठाकरे यांना वाटले की, आपण राज्याचे नेतृत्व करावे. उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. शिवसेनेचा संबंध केवळ राज ठाकरे यांच्याशी होता, असे संजय गायकवाड म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनायचे होते
निवडणूक आयोगाला कार्याध्यक्ष निवडूण द्यायचा होता. मात्र, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनायचे होते. तेव्हा त्यांच्या पुढे सर्वांत मोठी अडचण ही राज ठाकरे यांची होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत राज ठाकरेंचा राजकीय गेम केला, असा मोठा आरोप गायकवाड यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा, अशी बाळासाहेबांची इच्छा आहे. राज ठाकरे यांनी माझे नाव कार्याध्यक्ष पदासाठी पुढे करावे, हे बाळासाहेबांना सांगा, असे उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींना सांगितले होते. कारण राज ठाकरे बाळासाहेबांना क्रॉस करू शकणार नाहीत. मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांना तसे सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करावी लागली. शेवटी राज ठाकरे सुद्धा बाळासाहेबांच्या पुढे जाऊ शकत नव्हते. कार्याध्यक्ष बनण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही खेळी केली, असा मोठा दावा संजय गायकवाड यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"