Maharashtra Political Crisis: शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 13:59 IST2022-08-22T13:57:39+5:302022-08-22T13:59:16+5:30
Maharashtra Political Crisis: दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केल्याने आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी विविध वादाने एकमेकांना भिडण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसैनिकाला शिंदे गटात प्रवेश करताच मोठी लॉटरी लागल्याचे सांगितले जात आहे. शहर उपप्रमुख पदावरून शिंदे गटाने त्यांची नियुक्ती थेट जिल्हाप्रमुखपदी केली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात गेलेले सुजित चव्हाण यांची शिंदे गटाने कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. यामुळे आता जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत वादविवाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे इचरकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांच्या नावाची घोषणा शिवसेनेचे बंडखोर खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
एकनाथ शिंदेंनी सुरू केल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घोषणा
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणा सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण यांची निवड झाली. तर दुसरीकडे, हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघानुसार माजी नगरसेवक रवींद्र माने यांची जिल्हाप्रमुख निवड झाली. खासदार माने आणि राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या नियुक्तीची पत्रे दोघांकडे सुपूर्द केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सूरज चव्हाण यापूर्वी शिवसेना शहर उपप्रमुख होते. आता त्यांची जिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. सुजित चव्हाण यांचे वडील स्वर्गीय रामभाऊ चव्हाण हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. सध्या कोल्हापूरात शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव असे तीन जिल्हाप्रमुख आहेत. आता शिंदे गटाने दोन जिल्हाप्रमुख नियुक्त केल्याने आता दोन गटातील पदाधिकारी विविध वादाने एकमेकांना भिडण्याची चिन्हे आहेत. कारण सध्या शिवसेनेच्या वतीने बंडखोरांच्या घरावर मोर्चा काढण्यात येत आहेत. त्याला बंडखोराकंडून विरोध होण्याची चिन्हे आहेत.