संजय राऊत सायको माणूस, रश्मी वहिनींनी दिला होता प्रसाद; संजय शिरसाट म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:17 PM2023-02-17T15:17:09+5:302023-02-17T15:18:18+5:30
ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायला नको होतो त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला याचे वाईट वाटते असंही आमदार संजय शिरसाट म्हणाले.
मुंबई - पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवारांच्या चर्चेनंतरच पहाटेचा शपथविधी झाला असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर फडणवीस हे सुसंस्कृत नेते असून त्यांनी असं करायला नको असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस खोटे बोलत असल्याचं सांगितले. त्यात पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊतांनाही माहिती होते असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीच्या रणनीतीत राऊतही होते हे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सगळ्यांना माहिती पडले. परंतु परिस्थितीमुळे बोलता आले नाही. संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद मिळाला आहे. रश्मी वहिनीने हा प्रसाद दिला. आता पश्चातापाची वेळ निघून गेलीय. आता तेही पुढे गेलेत आणि आम्हीही पुढे आलोय. ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायला नको होतो त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला याचे वाईट वाटते. काय प्रसाद दिला हे मातोश्रीच्या ऑपरेटरपासून सगळ्यांना माहिती आहे. त्यावर आता भाष्य करणे उचित नाही असं त्यांनी सांगितले.
संजय राऊत हा सायको माणूस
एकदा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे मातोश्रीला बसलो होतो. संजय राऊत सहज बोलले साहेब मी सामनाला जातो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी म्हटलं अरे तू जाऊन उगाच दुसरं लफड निर्माण करशील त्यापेक्षा तू इथे बसलेला बरा आहे. हे आम्ही ऐकलेले आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्यावर भाष्य करणे, आपण काहीतरी वेगळे करतोय अशा अर्विभावात ते बोलतात अशी टीकाही शिरसाट यांनी राऊतांवर केली आहे.
...तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा ट्विस्ट आला
जेव्हा २०१९ मध्ये सत्तांतराबाबत मातोश्रीवरील बैठक, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सूचना हे सर्वकाही सुरू असताना संजय राऊत पडद्यामागून वेगळ्या हालचाली करत होते. शरद पवार आणि संजय राऊतांचे घट्ट नाते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर पाहिले शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर शरद पवार, संजय राऊत हे त्यांच्या दिनक्रमात व्यस्त होते. मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यात एक ट्विस्ट आला. आता जर हे थांबवायचं असेल तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागेल हा ट्विस्ट आला. सत्तासंघर्षात गेमचेंजर त्याठिकाणी झाला. उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती तरी त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.