Maharashtra Politics: बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’; शहाजीबापू पाटलांची मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:01 AM2022-10-12T10:01:40+5:302022-10-12T10:05:23+5:30
या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharashtra Politics: सध्या राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने यासाठी शिवसेना, भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाला नवीन चिन्हे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या पक्षाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालेले आहे. त्याविषयी आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत. हे चिन्ह महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने पारंपरिक प्रतीक आहे. क्षत्रियांचे हे चिन्ह आहे. महाराष्ट्राचा जिता-जागता स्वाभिमान जिवंत ठेवणारे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना साजेसे असे हे चिन्ह आम्हाला मिळालेले आहे. या चिन्हावर आम्ही निश्चित निवडणुका जिंकू, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील
या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आलेल्या या प्रस्तावाला निवडणूक आयोग मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे गटाने ई-मेलद्वारे पसंतीक्रमानुसार चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यात ‘सूर्य’ या चिन्हाला पहिली पसंती दिली होती. परंतु हे चिन्ह मिझोरामच्या एका प्रादेशिक पक्षाला दिलेले असल्याने ते चिन्ह आयोगाने नाकारले. दुसरे चिन्ह त्यांनी ढाल-तलवार मागितले होते. हे चिन्हही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट नाही. परंतु या चिन्हाशी साधर्म्य असलेले ‘दोन तलवार व एक ढाल’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"