"बाळासाहेब जिवंत असते तर, xxxx घरी बसा म्हटलं असतं"; शहाजीबापूंचा जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 02:17 PM2022-08-30T14:17:02+5:302022-08-30T14:59:18+5:30
मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलोय. मला लक्ष्य करून पाडणार, माझ्या एवढे पडायचं प्रॅक्टिस महाराष्ट्रात कुणाकडं नाही असा सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.
पुणे - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा. कारण बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून शिवसेना काम करतेय. उद्धव ठाकरेंनी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी घडली असती का? बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर युती झाली असती का? तुम्हीच सांगा, फिरकू सुद्धा दिलं नसतं. xxxx घरी बसा म्हटलं, कशाला चाललाय त्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडं असं म्हटलं असतं अशा शब्दात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
शहाजी पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा खूप मोठी होती. हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला आणि अडचणी निर्माण झाल्या. मतदारसंघात, वैचारिक पातळीवर लोकांना उत्तर देणे आम्हाला मुश्किल व्हायला लागलं. तुम्ही शिव्या देत होतो काँग्रेस-राष्ट्रवादीला मग त्यांच्यासोबत कसं गेला? असा प्रश्न जनता विचारू लागली. ज्यांची सत्ता अचानक रातोरात गेल्या ते भ्रमिष्ट झालेत. वैतागलेले आहेत असा टोला त्यांनी लगावला.
त्याचसोबत गद्दार, खोकी काढतायेत. आम्हाला डाळिंबाची पेटी भरणारी खोकी माहित्येत. ज्यांची संस्कृती राजकारणात खोक्यांवर अवलंबून आहे. अशी मनोवृत्तीच खोक्याचे बोलतात. ५० आमदार फुटले, आम्ही राजकारण करतो, ग्रामपंचायतीचा सदस्य फोडतानाही घाम फुटतो. इथे ५० आमदार फुटू शकतात. सगळ्यांच्या मनात जे होते ते घडलेले आहे असं शहाजीबापू पाटलांनी म्हटलं.
उद्धव-आदित्य ठाकरेंना २ बंगले घेऊन देतो....
दरम्यान, मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलोय. मला लक्ष्य करून पाडणार, माझ्या एवढे पडायचं प्रॅक्टिस महाराष्ट्रात कुणाकडं नाही. ७-८ वेळा पडलोय. राजकारणात याची पर्वा करत नाही. पडलो तरी पुढे चालायचं असतं. लक्ष्य चांगले करावे. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना २ बंगले भाड्याने देऊन ठेवतो. तिथे राहावं. लोकांची कामे करावी असा चिमटाही शहाजी पाटलांनी काढला.
लक्ष्मण विचित्र पात्र
ज्यानं २ वेळा आमदारकी लढवली त्याला २७० मते पडली. लक्ष्मण हाके माझा दोस्त असला तरी विचित्र पात्र आहे. ते पात्र लक्ष देण्यासारखं नाही. माझ्याकडं येणार धनगरांची मते मला पडतील. गणपतरावांकडं जाणार नाहीत असं म्हणतो. गणपतरावांकडं जातो त्यांना सांगतो बापूंना धनगरांची मते पडणार नाही म्हणून मी उभा राहतो असं हे पात्र आहे असा घणाघात लक्ष्मण हाकेंवर करण्यात आला.