Maharashtra Politics: कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:12 PM2022-09-22T17:12:15+5:302022-09-22T17:13:55+5:30
Maharashtra Politics: दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली असून, रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गटप्रमुखांच्या नेत्यांना जाहीररित्या संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिले. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ज्यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप झाले. यानंतर आता त्यांना क्लिन चीट दिली जात आहे. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा थेट सवाल करत उद्धव ठाकरेंनी भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला. याला उत्तर देताना भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले. रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन भावना गवळी यांनी केले.
अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे
मागील अनेक वर्षांपासून मी माझ्या मतदार संघातील एक लाखा पेक्षा जास्त बांधवाना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री , माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे, असे भावना गवळी यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटकाळात मदत केली. म्हणून मी त्यांना साथ दिली. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत असल्याचा आरोपही भावना गवळी यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीही भावना गवळी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले. भावना गवळींच्या वडिलांनी आयुष्य शिवसेनेसाठी घालवले. भावना गवळी तर लहान असल्यापासून खासदार आहेत. त्यांच्यावर मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली. तुम्हाला राखी बांधण्याचे काय महत्व असणार. ज्या महिलेने शिवसैनिकांचे नेतृत्व केले, एवढी वर्षे तिने पक्षाची सेवा केली, तिच्याविरोधात असे बोलतात. मी मर्द आहे, हे काल बोलले नाहीत. मोदींच्या कामासमोर तुम्ही नखाएवढे पण नाहीत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.