शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:07 AM2024-02-28T10:07:53+5:302024-02-28T10:08:21+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. त्यात शिंदे-ठाकरे यांच्यात नेत्यांच्या पळवापळवीचं राजकारण रंगत आहे.
नाशिक - लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक उलथापालथी राजकीय वर्तुळात पाहायला मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर अनेक आमदार, खासदार त्यांच्यासोबत गेले. मात्र महायुतीत आता ३ पक्ष एकत्र आल्यानं अनेकांना आपल्याच मतदारसंघात उमेदवारी पुन्हा मिळेल का अशी शंका आहे. त्यात शिंदे गटाचा एक खासदार पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना हा दावा केला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. हेमंत गोडसेंकडून पुन्हा ठाकरे गटात एन्ट्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा बडगुजर यांनी केला आहे. त्यामुळे गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न उभा राहिला आहे.
हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. नाशिकच्या जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २०१४ मध्ये पहिल्यांदा गोडसे खासदार बनले. त्यानंतर २०१९ ला पुन्हा नाशिककरांनी त्यांना संधी दिली. शिवसेनेपूर्वी ते मनसेत होते. मात्र २०२२ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीत हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ दिली. गोडसे यांचे नाशिकमध्ये मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे गोडसे पुन्हा ठाकरे गटात आले तर निश्चित ठाकरे गटाला बळ मिळेल. परंतु उद्धव ठाकरे हे हेमंत गोडसेंना पुन्हा पक्षात घेणार का यावर पुढची राजकीय गणिते अवलंबून आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार सत्तेसाठी बाजूला सारले असा आरोप एकनाथ शिंदेंकडून केला जातो. तर माझ्या बापाचं नाव चोरले, पक्ष चोरला, हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा असं म्हणत उद्धव ठाकरे सातत्याने शिंदेंवर घणाघात करतात. त्यात आता निवडणुका काही दिवसांवर असल्याने या दोघांमध्ये आणखी राजकीय वाद वाढण्याची चिन्हे आहेत.