Maharashtra Politics: “सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 02:07 PM2022-10-02T14:07:34+5:302022-10-02T14:08:20+5:30
Maharashtra Politics: शिवसेनेसह मविआच्या ‘५० खोके एकदम ओके’चा खरपूस समाचार घेताना ‘शंभर खोके एकदम ओके’ असे म्हणत शिंदे गटाने पलटवार केल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. एकीकडे पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे झटताना दिसत आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच शिंदे गटातील एका खासदाराने केलेल्या गौप्यस्फोटावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
जसजसा दसरा जवळ येत आहे, तसे दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांनी केलेल्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ‘५० खोके एकदम ओके’, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात येत होता. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच “शंभर खोके एकदम ओके”, या शब्दांत पलटवार केला आहे.
शंभर खोके एकदम ओके
अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते, असा मोठा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रतापराव जाधवांच्या या आरोपाला शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटातील आरोपांचा आता कंटाळा यायला लागला आहे. अगदी निचपणे हे आरोप सुरू आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे शोधावे लागेल. जो उठतो तो स्क्रिप्ट घेऊन बोलतो आहे. त्यामुळे यांच्या आरोपाला आम्ही काहीही उत्तर देणार नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"