Maharashtra Politics: “आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच...”; शिंदे गटाने दिली खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 04:00 PM2022-09-21T16:00:31+5:302022-09-21T16:01:47+5:30
Maharashtra News: बाळासाहेबांच्या विचारांचा गट म्हणून आम्ही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला असून, दुसरा गट महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यातच दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने ठाकले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभा, बैठकांवर भर देत आहेत. यातच शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आवाहन करण्यात आले असून, एका अटीवर उद्धव ठाकरेंचे स्वागत करू, अशी ऑफर दिली आहे.
शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची स्पष्ट भूमिका मांडावी. असे झाले तर शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रकट होतील, हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल. या भूमिकेचे आम्हीही स्वागत करू, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.
दुसरा गट हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही जेव्हा परवानगी मागतो, तेव्हा हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी आम्ही परवानगी मागत असतो. शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची दिशा संपूर्ण देशाला मिळते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट म्हणून आम्ही महापालिकेत अर्ज केला आहे. दुसरा गट हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे, या शब्दांत शेवाळे यांनी दसरा मेळाव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा एक गट
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा एक गट आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारा गट नाही. त्यामुळे परवानगी कोणाला द्यायची? यावरून महापालिकेपुढे कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे सोने लुटले पाहिजे. शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत, असे राहुल शेवाळे यांनी नमूद केले.