Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंची कीव येते, टीका करणे म्हणजे राजकारण नाही”; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:50 PM2022-09-08T17:50:29+5:302022-09-08T17:51:38+5:30
Maharashtra Political Crisis: सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांचे ऑफिसही कधी बघता आले नाही, अशी टीका शिंदे गटातील आमदाराने केली आहे.
Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. शिंदे गटातील आमदारही आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. आदित्य ठाकरे यांची कीव येते. केवळ टीका करणे म्हणजे राजकारण नाही, असे शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
पाच वर्षांपूर्वी पाचोरा शहरात आदित्य ठाकरे आले होते. मात्र त्यावेळचं चित्र व आताच चित्र बदललेले होते. हा विकास या अडीच वर्षांमध्ये झाला व तो फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला, असे किशोर पाटील यांनी नमूद केले. विकास कामांवरून कौतुकाची थाप देण्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी नेहमी टीका केली. केवळ टीका करणे म्हणजे राजकारण होत नाही. आदित्य ठाकरे यांची मला कीव येते. सत्तेत असताना मी आदित्य ठाकरे यांचे ऑफिसही बघू शकलो नाही, हे माझे दुर्भाग्य आहे, असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. २१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख आणि गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रमेश सोळंकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रा दौऱ्यापूर्वीच अमरावतीचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. शिंदे गटात जाणे म्हणजे शिवसेनेच्या वेगळ्या गटात जाण्यासारखे आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांचा विचार करता ज्यांनी मागच्या निवडणुकीत मला ६६ हजार मतदान केले त्यांची इच्छा आहे आपण भाजपत गेले पाहिजे. भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे सर्वानुमते शिवसैनिकांसह भाजपत प्रवेश असल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले.