"उद्धव ठाकरेही शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही; एकवेळ तुम्हाला विसरू, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:48 AM2022-07-26T10:48:14+5:302022-07-26T10:51:24+5:30
आज आम्ही पालापाचोळा वाटतो. उद्या तुम्हाला पालापाचोळा म्हटलं तर काय होईल? असा सवाल शिंदे गटातील आमदाराने थेट उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
मुंबई - आज ज्यांना सडलेली पानं, गळालेली पानं बोलता त्यांनी सावली दिली होती. मनोहर जोशी, लिलाधर डाके, प्रमोद नवलकर यासारख्या माणसांनी शिवसेना गावागावात रुजवली. झाडाला आलेली पानं सडली त्यांना उचलून कचऱ्यात टाकलं हे विधान खूप दु:ख देणारे आहे. लीलाधर डाके, सुधीर जोशी एखाद्याचं काम संपलं म्हणून त्यांना कचऱ्यात टाकलं हे म्हणणं कितपत योग्य आहे. गळालेली पान्यातून खतनिमिर्ती होते. त्यातून नवा अंकुर उभा राहतो हे त्यांना माहिती नाही असा टोला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे देशाचे नेते आहे. बाळासाहेब ठाकरे मोठे झाले ते उद्धव ठाकरेंना पाहावत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत त्यांचे फोटो, पुतळा तुमच्या स्टेजवर नको असं कुणी म्हटलं तर काय होईल. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, पुण्याईने आम्ही मोठे झालो. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा ठसा उमटवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ही माणसं खूप मोठी आहेत. शिवसेनाप्रमुखांनी छत्रपतींना नमस्कार केल्याशिवाय भाषणाला सुरूवात केली नाही. शिवसेनाप्रमुखांना छोटे करण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांनी सांगितले.
'मातोश्री'वर येण्याची तुमची इच्छा नियतीनेच पूर्ण केली?; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले
तसेच काळानुसार पक्ष बदलत जातो. मनोहर जोशी, लीलाधर डाके तुमच्या बाजूला बसले नाहीत. त्यांना तुम्ही झाडाचा पालापाचोळा कसं म्हणू शकता? या सर्व नेत्यांनी गावागावात जाऊन शिवसेना रुजवण्याचा प्रयत्न केला. मी ३८ वर्ष शिवसेनेत घालवली, आज आम्ही पालापाचोळा वाटतो. उद्या तुम्हाला पालापाचोळा म्हटलं तर काय होईल?. मी आजारी असताना हे सगळं घडलं हे उद्धव ठाकरेंचे विधान चुकीचे आहे. उद्धव ठाकरेंची प्रकृती चांगली व्हावी यासाठी आम्ही अभिषेक केला होता. त्याचे फोटो दाखवू. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नको अशी वारंवार आम्ही मागणी केली. परंतु आजच्या मुलाखतीत पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला तारलं हेच दिसून आले असंही शिरसाट यांनी सांगितले.
काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल
त्याचसोबत आमची चिंता करू नका. तुम्ही राज्यसभेला, विधान परिषदेला MIM ची मते घेताना काही वाटलं नव्हतं का? अडीच वर्ष आपण पहिलं घेऊ असं आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. शरद पवार-उद्धव ठाकरेंचे सख्य होतं हे आम्ही कधी पाहिलं नव्हतं. संजय राऊतांसारख्या माणसाने जुळवाजुळव का केली त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. एकसंघ असायला हवं ही भावना आजही आम्हाला वाटते. परंतु उद्धव ठाकरे आणि आमच्यातील अंतर कसं वाढेल यासाठी प्रयत्न सुरू केले असा आरोपही संजय राऊतांवर करण्यात आला.
"...हा 'आमच्या' आणि 'त्यांच्या' हिंदुत्वातला फरक", उद्धव ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचा रेफरन्स!
शिवसेनाप्रमुख तुम्हीही होऊ शकत नाही
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही होऊ शकत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या पायाजवळ राहू. शिवसेनाप्रमुखांची बरोबरी करण्याची आमची लायकी नाही. एकवेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरता येणार नाही असा घणाघात आमदार संजय शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.