एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार? आजच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 09:04 AM2022-06-25T09:04:19+5:302022-06-25T09:05:13+5:30
शिवसेना-शिंदे गटातील संघर्ष संपता संपेना... शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होण्याची शक्यता
Eknath Shinde Group Spokesperson: बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आज पाचव्या दिवशीही सुरू आहे. सुरूवातीला गुजरातमधील सुरत आणि त्यानंतर आसामच्या गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गट तळ ठोकून बसला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपासोबत सरकार स्थापन करा, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उलट, बंडखोर नेत्यांची नाराजी असलेले संजय राऊत हे शिवसेनेची बाजू मांडत असताना अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचीही बाजून माध्यमांपुढे योग्य पद्धतीने मांडली जायला हवी या अनुषंगाने आज एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्याची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.
Live: सत्ता संघर्षाचा पाचवा दिवस, आज शिंदे गट पुढचं पाऊल उचलणार?#UddhavThackareyhttps://t.co/z3KBycr26q
— Lokmat (@lokmat) June 25, 2022
प्रवक्ते कोण असतील? पत्रकार परिषद कधी?
एकनाथ शिंदे गट हा बंडखोरांचा गट आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष या गटावर टीका करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गटाची भूमिका नीट, मुद्देसूदपणे जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून मांडण्यासाठी शिंदे गट आज प्रवक्त्यांची नेमणूक करू शकतो. शिंदे गटात सुरू असलेल्या हालचाली आणि त्यांची राजकीय भूमिका यांच्याबाबतची माहिती मीडियाच्या समोर येऊन देणे यासाठी या प्रवक्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. गुवाहाटीत असलेल्या हॉटेलमध्ये शिंदे गटाची बैठक होईल आणि त्यात या प्रवक्त्याची नेमणूक केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भरत गोगावले आणि बच्चू कडू यांच्या नावाची या पदासाठी चर्चा आहे. तसेच शिंदे गटाची पहिली पत्रकार परिषद देखील आज होण्याची शक्यता आहे.
काही आमदारांना जेवायला जायचं सांगून गाडीत बसवलं आणि कैदी बनवून सूरतला नेलं, आदित्य ठाकरेंचा आरोप#Shivsena#AdityaThackeray#UddhavThackeray#EknathShinde#MaharashtraCrisishttps://t.co/KF61D4nS0b
— Lokmat (@lokmat) June 24, 2022
एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कोणीही विशिष्ट व्यक्ती नाही. एकनाथ शिंदे हे माध्यमांशी फोनच्या माध्यमातून बोलतात. पण तसे न करता थेट मीडियाशी संवाद साधून आपल्या गटाची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी प्रवक्त्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये माहिती पोहोचवण्यासाठी सुसूत्रता यावी यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानुसार आजच बैठक घेऊन प्रवक्त्यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.