Eknath Shinde: शरद पवार मला वेळोवेळी फोन करतात; एकनाथ शिंदेंनी भर सभेत केला 'गौप्यस्फोट', सांगितले कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 07:23 PM2023-01-21T19:23:09+5:302023-01-21T19:23:28+5:30
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
शरद पवार यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे हे काम नजरअंदाज करता येण्यासारखे नाहीय, अशा शब्दांत पवारांची स्तुती करत ते आपल्याला वेळोवेळी फोन करत असतात, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.
राज्याच्या विकासात आपल्या सर्वांचे सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. पवार साहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी गेली अनेक वर्षे या राज्यात आणि देशांमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचे योगदान देखील फार मोठं आहे. त्यामुळे ते कुठला माणूस सत्तेवर बसला आहे हे न पाहता राज्याच्या हितासाठी नेहमी मार्गदर्शन करत असतात. मला देखील जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा ते फोन करतात, सूचना देत मार्गदर्शनही करतात, असे शिंदे यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंधनामध्ये दहा टक्के इथेनॉल मिक्स करण्यास सुरुवात केली. हे मिक्सिंग आणखी वाढेल असे मोदी मला परवा म्हणालेत. हळू हळू शंभर टक्के इथेनॉलचा वापर करणारी वाहने देखील निर्माण होतील. यामुळे आपल्या साखर कारखान्यांना एक प्रकारची नवसंजीवनी मिळत आहे, असे शिंदे म्हणाले.
शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री होते त्यावेळेस देशातले अनेक मुख्यमंत्री, कृषिमंत्री किंवा उद्यमशील शेतकऱ्यांना ते नवीन कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी परदेशात पाठवत होते. नव नवीन तंत्रज्ञान छोट्या देशांत आहे. परंतु त्या ठिकाणी आणखी काही देश आहेत की त्याच्याकडे अद्यावत असे तंत्रज्ञान आहे. त्यावेळेस पवारांनी हे काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा या कृषी क्षेत्राला नक्कीच झालेला आहे. त्यांच्या या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आपण सर्वांनी या सहकार क्षेत्रात कृषी क्षेत्रामध्ये करून घ्यायला पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.