एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 08:40 PM2022-10-07T20:40:10+5:302022-10-07T20:40:32+5:30
आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य-बाणाची लढाई सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चिन्हावर दावा ठोकत, आपल्याच गटाचा या चिन्हावर (धनुष्य-बाणावर) अधिकार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी, आपली बाजू मांडताना उद्धव ठाकरे गटाने आयोगासमोर तर्क ठेवला, की एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी स्वतःच पक्ष सोडला आहे. यामुळे शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर त्यांचा कसलाही दावा असू शकत नाही. कारण ते पक्षातूनच बाहेर गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी गेल्या जून महिन्यात शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी तब्बल 40 आमदारांसह बंडाचा झेंडा उंचावला होता. एवढेच नाही, तर यानंतर त्यांना तब्बल एक डझन खासदारांचे समर्थनही मिळाले. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पक्षाच्या दावेदारीवरून संघर्ष सुरू आहे. मात्र, सध्या तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत.
तर दुसऱ्या बाजूला, आपल्यासोबत अधिक नेते आहेत, यामुळे आपला गटच खरी शिवसेना आहे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. यावेळी दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून स्वतंत्र मेळावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जवळपास दोन लाख लोक एकत्र आले होते. तर शिवाजी पार्कमध्ये एक लाख कार्यकर्ते जमले होते.