“आम्ही दोघं मिळून २०० लोक निवडून आणू, ते नाही केलं तर..,” एकनाथ शिंदेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:12 PM2022-07-04T17:12:19+5:302022-07-04T17:13:02+5:30
आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे गेलोय - एकनाथ शिंदे
विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना २०० पेक्षा अधिक जण निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला.
“आम्हाला काय होणार हे माहित आहे. आमच्या लोकांचा जीव टांगणीला लागला होता. दुसरीकडे मोदी, त्यांनी जगाला आपल्याकडे घेतलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं. फडणवीस खूश होते, काय आहे हे त्यांना माहित होतं. त्यांचं ११५ आणि आमचे ५० एकूण मिळून झाले १६५ जण. दादा मगाशी म्हणाले जे गेले ते निवडून येणार नाही. आम्ही कुठे गेलोय? पूर्वी गेले ते विरूद्ध पक्षात गेले,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे गेलोय. त्यामुळे आम्ही दोघं मिळून १६५ नाही २०० लोक निवडून आणू. आमच्या लोकांना मी सांगितलं, चिन्ह काय मिळणार. आपण शिवसेना आहोत, ५० मधून एकही माणूस पडू देणार नाही आणि भाजपचे जे लोक आहेत ते मिळून २०० करणार. हा शब्द आहे. ते नाही केलं तर गावाला शेती करायला जाईन, नाहीतर माझा एक छोटा नातू आहे फुल टाईमपास आहे. माझी तिच संपत्ती आहे, असंही ते म्हणाले.