"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 01:14 PM2024-12-05T13:14:22+5:302024-12-05T13:28:04+5:30

एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde mindset was not to become Deputy Chief Minister says Gulabrao Patil | "त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

Gulabrao Patil : देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शपथ घेणार घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र त्याआधी देवेंद्र फडणीसांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करुन उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याची विनंती केली. मात्र एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
 
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर आज पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे या सरकारमध्ये राहणार की नाही याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक देखील झाली. शिवसेना आमदारांनीही एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये राहण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी तयार झाले. दुसरीकडे, आमच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री व्हावा असं शिंदेंना वाटत होतं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. पण एकनाथ शिंदेनेच पदभार सांभाळावा ही आमची इच्छा आहे असेही पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद मिळावा अशी इच्छा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एबीपी माझासोबत गुलाबराव पाटील बोलत होते.

"काँग्रेसलाही कधी एवढं यश आलं नव्हतं तेवढे यश या सरकारला मिळाले आहे. पाच वर्षे सरकार सुरळीत चालण्यासाठी एवढं जनमत मिळालं आहे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्हाला कामातून खरं उतरावं लागणार आहे. आज सगळ्यांकरता आनंदाचा दिवस आहे. कालपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही असं चित्र होतं. पण सगळ्या आमदारांनी त्यांना जाऊन रात्री विनंती केली आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमची या राज्याला गरज आहे. तिघेही जर एकत्र राहिले तर राज्याचा विकासाला मोठा फायदा होणार आहे. त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि ते आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत," असं गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली आहे का असं विचारला असता गुलाबराव पाटील यांनी "उपमुख्यमंत्री होण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्यातून कोणीतरी उपमुख्यमंत्री व्हावं. पण सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्हीच उपमुख्यमंत्री व्हा आणि तुम्ही सत्तेत राहा कारण तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही," असं म्हटलं.

निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी रोज दहा दहा सहभाग घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सगळ्यांकरता काम केलं. दोन महिन्याची केलेली कसरत आता बाहेर निघत आहे. त्यामुळे ते आजारी होते. त्याचाही अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर मला वाटतं ते योग्य नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
 

Web Title: Eknath Shinde mindset was not to become Deputy Chief Minister says Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.