एकनाथ शिंदेंचे दुसरे ट्विट! 'बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:44 PM2023-04-27T20:44:05+5:302023-04-27T20:44:34+5:30
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: आता हा वाद राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापविण्याची चिन्हे आहेत.
काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना उद्देशून ट्विट केलेले असताना पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत आक्रमण केले आहे. आताच्या ट्विटमध्ये बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, परंतू सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही, अशी जहरी टीका केली आहे. आता हा वाद राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापविण्याची चिन्हे आहेत.
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशी टीका शिंदे यांनी केली होती.
यानंतर शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वी आणखी एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे. या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचा आहे, असे शिंदे म्हणाले आहेत.
स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे यांना आरसा दाखविला आहे.
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही.
आम्हाला बदल घडवायचा आहे…
या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय …
गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल…
पहिल्या ट्विटमध्ये शिंदेंनी डिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे..., असा टोलाही शिंदे यांनी लगावला होता. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की, असा इशाराही शिंदे यांनी दिला होता.