"एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको", नाना पटोलेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:03 PM2022-09-14T15:03:46+5:302022-09-14T15:04:17+5:30
Nana Patole: मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे
मुंबई - महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात गुंतवणूक आणण्याच्या प्रयत्नातूनच महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉनशी चर्चा केली होती. महाराष्ट्र सरकार व वेंदाता-फॉक्सकॉन यांच्यात अंतिम टप्प्यापर्यंतच्या वाटाघाटीही झाल्या होत्या तसेच पुण्याजवळच्या तळेगावची जागा गुजरातमधील जागेपेक्षा जास्त फायदेशीर होती. महाराष्ट्र सरकारकडूनही या प्रकल्पासाठी चांगले पॅकेज दिले होते पण राज्यात सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला.
तळेगावमध्ये हा प्रकल्प झाला असता तर लाखो रोजगारासह त्या भागात छोट्या-मोठ्या उद्योगाची साखळी निर्माण झाली असती यातून राज्याला मोठा आर्थिक फायदा झाला असता. पण महाराष्ट्रातील हा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये जाईपर्यंत ईडी सरकारने झोपा काढल्या आणि प्रकल्प गुजरातमध्ये गेला याचे खापर भाजपाचे नेते मविआ सरकारवर फोडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४-१९ या सत्ताकाळात मुंबईतील प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय वित्त सेंटर, डॉकयार्ड, हिरे व्यापार गुजरातला गेला आणि आता फॉक्सकॉनही गुजरात गेला. भाजपाचे षडयंत्र पहाता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही पटोले यांनी लगावला.