एकनाथ शिंदे चार दिवसांनंतर 'ॲक्टिव्ह मोड'वर; आज बैठकांचा सिलसिला, खातेवाटपावर तोडगा निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 09:27 AM2024-12-03T09:27:37+5:302024-12-03T09:43:20+5:30

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका होणार आहेत.

Eknath Shinde on active mode after four days Will there be a solution to the allocation of ministerial posts | एकनाथ शिंदे चार दिवसांनंतर 'ॲक्टिव्ह मोड'वर; आज बैठकांचा सिलसिला, खातेवाटपावर तोडगा निघणार?

एकनाथ शिंदे चार दिवसांनंतर 'ॲक्टिव्ह मोड'वर; आज बैठकांचा सिलसिला, खातेवाटपावर तोडगा निघणार?

Ekanth Shinde Shiv Sena ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटल्यानंतरही महायुतीत सुरू असलेला मंत्रिपद वाटपाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्रि‍पदासह अन्य महत्त्वाची खाती कोणाकडे असणार, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील चार दिवसांपासून आजारी असल्याने महायुतीतील चर्चेला ब्रेक लागला होता. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात  विविध बैठका होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे सकाळी बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील विविध नेत्यांना भेटतील. मागील दोन दिवस ठाण्यात असूनही तब्ब्येत बरी नसल्याने शिंदे यांनी आमदार-खासदारांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या. त्यामुळे आज ते मंत्रि‍पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना भेटतील. तसंच सत्तेत आपला वाटा कसा असावा, याबाबत ते शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे समजते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही लवकरच होऊ शकते. याच बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाण्याची शक्यता आहे.

मंत्रि‍पदाबाबत कसा असेल महायुतीचा फॉर्म्युला? 

महायुतीमध्ये शिंदेसेनेला १२ ते १३ तर अजित पवार गटाला आठ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपला २२ ते २३ मंत्रिपदे मिळू शकतात. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे असा त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांचा आग्रह आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील अशी दाट शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपला, उपाध्यक्षपद अजित पवार गटाला, विधान परिषदेचे सभापतीपद शिंदेसेनेला तर उपसभापतीपद भाजपला दिले जाऊ शकते.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक सोमवारी घेणार होते, पण ताप व थ्रोट इन्फेक्शन झाल्याने त्यांना झाल्यान डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या बैठकीसह सर्व बैठका त्यांनी रद्द केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदे- फडणवीस-अजित पवार यांनी गेल्या गुरुवारी दिल्लीत चर्चा केली होती. तिन्ही नेत्यांनी आता मुंबईत भेटावे आणि मंत्रिपदांचे व खात्यांचे वाटप याबाबत निर्णय करावा असे ठरले होते. मात्र, मुंबईत अशी बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज मंत्रिपद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Eknath Shinde on active mode after four days Will there be a solution to the allocation of ministerial posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.