एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? अंजली दमानियांची पोस्ट, महायुतीत नेमके काय राजकारण घडतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:28 AM2024-12-03T08:28:36+5:302024-12-03T08:29:14+5:30

Eknath Shinde Maharashtra CM News: भाजपा ५ डिसेंबरला शपथविधी करण्याच्या तयारीला लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे कयास बांधले जात आहेत. परंतू, या शपथविधीला शिंदे असतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde opposition leader? Anjali Damania's post, what politics is actually happening in Mahayuti after Maharashtra Assembly Election result... | एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? अंजली दमानियांची पोस्ट, महायुतीत नेमके काय राजकारण घडतेय...

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? अंजली दमानियांची पोस्ट, महायुतीत नेमके काय राजकारण घडतेय...

राज्यात विधानसभा निकाल लागून आता १० दिवस उलटले आहेत. अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे प्रचंड बहुमत मिळविलेल्या महायुतीला ठरविता येत नाहीय. महायुतीचे सारे काही घोडे अडलेले आहे ते एकनाथ शिंदेंच्या मागणीवर. शिंदे काही मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीत. सोडलेच तर गृहमंत्री पद, अर्थमंत्री पद द्यावे अशी मागणी त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यात केलेली आहे. याला भाजपाने होकार दिलेला नाही. यामुळे सगळा पेच फसलेला असतानाच अंजली दमानियांची एक सूचक पोस्ट व्हायरल होत आहे. 

भाजपा ५ डिसेंबरला शपथविधी करण्याच्या तयारीला लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे कयास बांधले जात आहेत. परंतू, या शपथविधीला शिंदे असतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. शिंदे दिल्लीवरून परतल्यानंतर सारखे आजारी पडत आहेत. शिंदे गावी जाऊन आजारी पडले होते. गावी जाण्यापूर्वी शिंदेंनी महायुतीची बैठक रद्द केली होती. आता ठाण्यात परतल्यानंतर पुन्हा आजारी असून पुन्हा महायुतीची बैठक रद्द झाली आहे.

शिंदेंनी भाजपाचे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य असेल असे जरी माध्यमांसमोर कबुल केलेले असले तरी आतमध्ये काहीतरी राजकारण घडत असल्याचा अंदाज आता जनतेला येऊ लागला आहे. अशातच दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते बनू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. 

विरोधी पक्ष मविआला विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढ्याही जागा मिळालेल्या नाहीत. यामुळे शिंदेना मुख्यमंत्री पद नाही तर मग विरोधी पक्ष नेते पद देऊन सरकारही आपलेच, विरोधी पक्षनेताही आपलाच अशी रणनिती भाजपा आखत असल्याचा अंदाज दमानिया यांनी केला आहे. ४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कुछ काला है, असा संशय दमानिया यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच दमानिया यांनी एका पत्रकाराचा हवाला देत शिंदेंना विरोधी पक्षात बसविण्याची भाजपाचीच रणनिती असू शकते. शिंदेंना काय हवे नको ते पुरविले जाईल व विरोधी नेताही यांचाच होईल, बाकी सगळे साफ, असेच होताना दिसतेय, असे सूचक ट्विट दमानिया यांनी केले आहे. 

Web Title: Eknath Shinde opposition leader? Anjali Damania's post, what politics is actually happening in Mahayuti after Maharashtra Assembly Election result...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.