Fire Incident: नाशिक, विरारच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग; सर्व रुग्णालयातील फायर, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:59 PM2021-04-27T19:59:34+5:302021-04-27T20:02:13+5:30
Fire Incident: एमएमआर रीजनमधील सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ठाणे: एमएमआर रीजनमधील सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवारी) दिले. सध्या वाढत असलेल्या आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेश त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले.
एमएमआर रीजनमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत व्हीसीद्वारे आज बैठक पार पडली. यावेळी ठाणे,रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या पेशंट्सची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना शिंदे यांनी केली.
नागपूर जायचेय आठ हजार द्या... चंद्रपूर जायचे असेल तर १२ हजार मोजा !
उन्हाळा सुरू झाल्याने एसी आणि व्हेंटिलेटर यांमुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी फायर ब्रिगेड तैनात करण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. यासोबतच अनेकदा रात्री अपरात्री खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या घटना टाळण्यासाठी सहाययक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळवणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कोविड केअर सेंटर मधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देखील शिंदे यांनी दिलेत.
लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
एमएमआर रीजन मधील काही महानगरपालिकांच्या भागातील करोना रुग्णाची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदवले.मात्र तरीही ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून हे प्लांट कार्यान्वित करण्याचे निर्देश देखील नगरविकास मंत्र्यांनी सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.