बाळासाहेबांना वंदन अन् आनंद दिघेंचं स्मरण... एकनाथ शिंदेंची शपथ ठरली लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 08:42 PM2019-11-28T20:42:19+5:302019-11-28T20:51:49+5:30
महाविकास आघाडीच्या शपथविधी साेहळ्यात नेत्यांनी वेगळ्या पद्धातीने शपथ घेतली. यात शिंदे यांनी देखील त्यांच्या नेत्याचा आवर्जुन उल्लेख केला.
मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर आज महाविकास आघाडीचा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. ठाकरे यांच्याबराेबरच शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या प्रत्येकी दाेन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी ठरली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले, तसेच आपले गुरु आनंद दिघे यांचे त्यांनी आवर्जुन स्मरण केले.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार यावर शिक्कामाेर्तब झाले. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमताने देण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्यारुपाने पहिल्यांदा ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. आज संध्याकाळी 6. 40 मिनिटांनी शिवाजी पार्क मैदानावर या महाविकास आघाडीचा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी शपथ घेण्याआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचे स्मरण करुन, आई-वडीलांच्या पुण्याईने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांच्या आशिर्वादाने, मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…” असं म्हणत शिंदे यांनी शपथ घेतली.
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा माेठा नेता म्हणून शिंदे यांची ओळख आहे. शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री तसेच काेपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे हे आनंद दिघे यांना आपले राजकीय गुरु मानतात. शिंदे यांच्या कारकीर्दीमध्ये दिघे यांचा माेठा वाटा आहे. दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व शिंदे यांनी कायम ठिकवून ठेवले. तसेच शिंदे यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली.