'उद्धव ठाकरेंना अजूनही नेता मानता का?' असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:20 PM2022-06-22T14:20:03+5:302022-06-22T14:22:32+5:30
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे शिवसेना, महाविकास आघाडीला धोका
Eknath Shinde Uddhav Thackeray Shivsena | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जात. पण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांना मानणाऱ्या गटाला सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा होती. या चर्चांना बंडाने एका अर्थी दुजोरा मिळाला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थनार्थ असलेल्या सुमारे ३०पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन राज्य सोडले. काल सुरत तर आज गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीशी विशेष संवाद साधला. त्यावेळी, "उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी एक प्रकार घडला.
महाविकास आघाडी स्थापन होत अशी चर्चा होती की, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचा उमेदवार असेल अशी बोलणी झाली होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार केला जात होता. पण संजय राऊत आणि इतर काही शिवसेना नेत्यांनी या नावाला विरोध केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. ही बाब एकनाथ शिंदे यांनी पचवली पण त्यानंतर त्यांच्या खात्यात सातत्याने हस्तक्षेप असल्याने त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. या मुद्द्यावर गुवाहाटीमधून एबीपी न्यूजने त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर पुढे जाणार असल्याची भूमिका मांडली. याच वेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. "बाळासाहेब हे तुमचे नेते आहेतच, पण उद्धव ठाकरे यांना तुम्ही अजूनही तुमचे नेते मानता का?", यावेळी ते काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण त्याच वेळी संपर्क तुटला. त्यानंतर फोन कट झाला की केला, अशी चर्चा रंगल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे बंडखोर झाल्यापासून सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा उल्लेख करत आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणं ते प्रकर्षाने टाळताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक काहीही बोलण्याचे त्यांनी सातत्याने टाळल्याचे दिसते. त्यामुळे एकनाथ शिंदे नक्की उद्धव यांच्यावर नाराज आहेत की नाहीत, यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहे.