Eknath Shinde : "... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय"; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 01:08 PM2024-09-01T13:08:03+5:302024-09-01T13:17:43+5:30
Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. मविआतर्फे हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
"विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नको आहे. महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्यात, जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण महाराष्ट्रातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे. म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे."
"विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणार… हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये दहशत, भीती पसरवून मतं मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.
#WATCH | On the MVA (Maha Vikas Aghadi) protest ver Chhatrapati Shivaji Maharaj's statue collapse incident, Maharashtra CM Eknath Shinde says, "...This is s very sad thing for us...Shivaji Maharaj cannot be a political issue for us, this is a matter of identity and faith for us.… pic.twitter.com/6rSpxMgApG
— ANI (@ANI) September 1, 2024
"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. गावागावात शहराशहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोहोचली आहे. दुर्देव बघा. एक काँग्रेसचा माणूस अनिल वडपल्लीवार कोर्टात आडवा झाला आहे. तो कुणाचा कार्यकर्ता आहे. कुणाचा पोलिंग एजंट आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हायकोर्टातही याचिका केली. ती कोर्टाने फेटाळली. आता नागपूरला याचिका केली आहे."
"महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणौतचं घर तोडलं. किती महिलांवर अन्याय केला... महाविकास आघाडी सरकारमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये" असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.