"बाळासाहेबांच्या विचारांशी विसंगत भूमिका घेतल्यानं उद्धव ठाकरेंना नैराश्य आलंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 10:18 AM2022-07-27T10:18:39+5:302022-07-27T10:19:11+5:30
आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले असं शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे.
मुंबई - उद्धव ठाकरेंची मुलाखत दोन टप्प्यात पाहिली. सामनाचे संपादक संजय राऊत त्यांचेच प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यामुळे मुलाखतीकडे फारसं गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ही मॅच फिक्सिंग आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. एकनाथ शिंदेंबाबत समाजात मतभेद निर्माण करण्याचा केविळवाणा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांनी कधीही बाळासाहेबांशी, आनंद दिघेंशी तुलना केली नाही. नैराश्यापोटी उद्धव ठाकरे अशी विधाने करत आहेत असा टोला शिंदे गटातील आमदार शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, बाळासाहेब आमचे दैवत आणि दिघे आमचे गुरू आहेत. परंतु केवळ लाखो शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांची भूमिका पटली आहे. त्यामुळे संभ्रम, नाराजी निर्माण करण्याचं काम मुलाखतीतून केले जात आहे. राज्यातील जनतेने एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे राज्याच्या दौऱ्यावर जातील तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी रस्त्यावर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंवरील टीका दुर्दैवी
एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका अतिशय दुर्देवी आहे. २०१९ च्या निकालानंतर सत्तास्थापनेचा विषय पुढे आला तेव्हाचे रेकॉर्डिंग काढून बघा, सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन. परंतु जेव्हा हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा शेवटच्या २ दिवसांत नेमकं काय घडलं? ज्यामुळे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. किमान ५ ते १० वेळा एकनाथ शिंदेंनी आमदारांची भूमिका उद्धव ठाकरेंच्या कानी घातली होती. आमदारांची गळचेपी होत आहे काहीतरी निर्णय घ्या. परंतु उद्धव ठाकरेंनी कुठलाही निर्णय घेतला नाही. उलट ज्यावेळी आम्ही ही भूमिका घेतली तेव्हा मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांना चर्चेसाठी सूरतला पाठवले आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवायचं. त्यामुळे एकनाथ शिंदेंबाबत जे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे ते निराधार आहे. त्यात कुठलेही तथ्य आणि आधार नाही असं स्पष्टीकरण आमदार शंभुराज देसाई यांनी दिले.
मविआच्या संख्याबळासाठी आम्ही चाललो अन् आता विश्वासघातकी
आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले. सामान्य शिवसैनिकांच्या भावनेला वाचा फोडण्याचं काम केले. त्याला विश्वासघातकी म्हणतात. याच लोकांना घेऊन तुम्ही महाविकास आघाडी चालवली. संख्याबळाला आम्ही चाललो आणि आता बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन चाललो त्याला विश्वासघात म्हणत असाल तर ज्या बाळासाहेबांनी सांगितले होते मी माझ्या शिवसेनेला कदापि काँग्रेससोबत जाऊ देणार नाही. मुंबईत ज्याने बॉम्बस्फोट घडवले त्याच्याशी थेट संबंध असणाऱ्याशी राष्ट्रवादी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची विसंगत टोकाची भूमिका तुम्ही घेतली. त्यामुळे नैराश्येपोटी विश्वासघातकी, पालापाचोळा, गद्दार असे शब्द वापरण्यात आले असा टोला शंभुराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.