Eknath Shinde Shivsena Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे नाराजी नाट्य सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले? चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 12:29 PM2022-06-21T12:29:52+5:302022-06-21T12:57:59+5:30
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
Eknath Shinde Shivsena Devendra Fadnavis: भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्षात असतानाही राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोनही निवडणुकांमध्ये त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. भाजपाच्या या विजयानंतर शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गुजरात भाजपाच्या काही नेत्यांसोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात वेगळी समीकरणं उदयास येणार का? अशी चर्चा आहे. याच दरम्यान भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला निघाले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामागे नक्की कारण काय? याचं उत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
फडणवीस दिल्लीत का गेले?
शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याने अचानक मध्यरात्रीपासून नॉट रिचेबल झाले. त्या पाठोपाठ ते भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये असल्याचे समजले. एकनाथ शिंदे हे सुमारे २८-३० आमदारांसह सुरतमध्ये आहेत. त्याच वेळी भाजपाचे राज्यातील मोठे नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला निघाल्याने भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस भाजपाच्या केंद्रातील नेत्यांशी एकनाथ शिंदे मुद्द्यावर चर्चा करायला गेले आहेत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला. त्याबाबत बोलताना, "कालच आम्ही विधान परिषदेत मोठा विजय मिळवला आहे. असे दमदार विजय मिळवल्यानंतर केंद्रातील महत्त्वाच्या लोकांना मिठाई देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत विजयाचं सेलिब्रेशन करायचं असतं. त्यामुळे फडणवीस दिल्लीत गेले", असं चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं.
दरम्यान, "एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून ते नाराज असल्याचं मी टेलिव्हिजनवर पाहिलं. शिवसेनेचा हा पक्षांतर्गत विषय असून याबाबत आम्हाला अद्याप काहीच कल्पना नाही. जनतेनं दिलेलं बहुमत नाकारुन राष्ट्रवादी-काँग्रेससोबत केलेला घरोबा त्यांना पटलेला नसावा. आम्ही भजनी मंडळी नाही. आम्हीही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे असा काही प्रस्ताव आला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे अशापद्धतीचं कोणताही प्रस्ताव भाजपाकडे आला तर आम्ही नक्कीच त्याबाबत विचार करू", असं सूचक विधानही चंद्रकांत पाटील यांनी केले.