महापालिका, नगरपरिषदांमध्ये 40 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 08:29 PM2023-01-11T20:29:19+5:302023-01-11T20:29:46+5:30
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
मुंबई: सराकरी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Eknath Shinde Devendra Fadnavis) नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तब्बल 40 हजार पदांच्या भरतीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत पार पडली. पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये ३७२० पदांची #भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 11, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद-पंचायतीमध्ये 55 हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून, त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील 40 हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच, राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे.
..@mybmc तील ८४९० पदांची #भरती प्रक्रिया सुरु केली असून मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. pic.twitter.com/NYWfh5YR67
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 11, 2023
याशिवाय, मुंबई महापालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या निर्णयामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी असणार आहे.