एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 05:12 PM2022-06-26T17:12:26+5:302022-06-26T17:17:02+5:30
Maharashtra Political Crisis: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा दावा केला आहे.
औरंगाबाद: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौफ्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. पण, 100 कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले.
'गाड्या भरुन पैसे आल्याचे फुटेज'
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. 'सेनेतून बंडखोरी करण्यासाठी 50 कोटींची अधिकची ऑफर होती. माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही आहे. मात्र मी गद्दारी केली नाही, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. अगदी 100 कोटी दिले तरी मी गद्दारी करणार नाही,' असं राजपूत म्हणाले आहेत.
मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना
दरम्यान, शिंदे गटात सामील होणाऱ्या नेत्यांची यादी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंत्री उदय सामंत हेदेखील गुवाहाटीला रवाना झाले आहेत. ANI या वृत्त संस्थेने याबाबत ट्विट केले आहे. उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत.
बंडखोरांना केंद्राची सुरक्षा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, 15 बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. शनिवारी सकाळीच शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना 37 आमदारांच्या सहीचे पत्र पाठविले होते. यामध्ये आमच्या कुटुंबीयांचे संरक्षण काढून घेतल्याचा आरोप केला होता.