संजय राऊतांविरोधात मोठा गौप्यस्फोट; बंडखोर शिवसेना आमदारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:41 PM2022-06-27T15:41:37+5:302022-06-27T15:42:08+5:30

भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदूत्त्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे? असा सवाल आमदारांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

Eknath Shinde Revolt: Big blast against Sanjay Raut; Serious allegations of rebel Shivsena MLAs | संजय राऊतांविरोधात मोठा गौप्यस्फोट; बंडखोर शिवसेना आमदारांचा गंभीर आरोप

संजय राऊतांविरोधात मोठा गौप्यस्फोट; बंडखोर शिवसेना आमदारांचा गंभीर आरोप

googlenewsNext

गुवाहाटी - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याचं दिसून आले. आता या सर्व आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी बंडखोर आमदारांची कार्यालये फोडली जात आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक टीका करत आहेत. 

आता यावर बंडखोर आमदारांनी थेट भूमिका मांडत संजय राऊतांविरोधातच गंभीर आरोप केले आहेत. दीपक केसरकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलंय की, २०१४ ची निवडणूक असो की २०१९ नंतर राज्यात उद्बवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की, भाजपाचे केंद्रीय अथवा राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही आमचे आदर्श वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. २०१४ मध्ये काही दिवसातच शिवसेना आणि भाजपा पुन्हा सोबत आली. केंद्रात आमचेही मंत्री झाले. पण हाच तो कालखंड होता. जेव्हापासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला. म्हणजे केंद्रात मंत्रिपदे घ्यायची, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे, राज्यातील सरकारमधील घटकपक्षही राहायचे आणि मोदींवर जहरी टीका करायची यातून दोन पक्षांतील दरी वाढवण्याचे काम प्रारंभ करण्यात आले. याही काळात आम्ही सर्व आमदार वेळोवेळी या बाबी पक्षनेतृत्वाच्या लक्षात आणून देण्याचे काम करतच होतो. पण त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. दररोज अतिशय अश्लाघ्य शब्दात टीका होतच राहायची. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरत नाही ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडी कायम असते असा आरोप बंडखोर आमदारांनी केला. 

तसेच २०१९ जसजसे जवळ येत गेले, तसा हा विखार आणखी वाढत गेला. २०१९ ला सरकारचे गठन ही औपचारिकता मात्र शिल्लक राहिली असताना अचानक हेच संजय राऊत पुन्हा सक्रिय झाले. त्यांच्या या सक्रियतेला शरद पवार साहेबांचे आशिर्वाद होतेच. जनतेने जनादेश शिवसेना-भाजपा युतीला दिला होता. पण, ज्यांना आपण मराठी माणूस म्हणतो, त्याच मराठी माणसाचा. त्याही वेळी आम्ही वारंवार सांगत होतो की, आपण भाजपासोबत राहिले पाहिजे. ज्यांनी हिंदूत्त्वाचा सातत्याने अपमान केला, ज्यांच्याविरोधात हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजन्म लढले, ज्यांनी शिवसेना फोडली आणि नेते आपल्या पक्षात घेतले, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना जेलमध्ये टाकण्याचा जप्रयत्न केला, ज्यांनी आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घोर अपमान एकदा नाही तर सातत्याने केला आणि अगदी हे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यावर सुद्धा सावरकरांचा अपमान जे सातत्याने करीत राहीले, अशांसोबत बसणे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हते. पण, पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्ही निमूटपणे करीत राहिलो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत दुर्दैव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदूत्त्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे? आणखी दुर्दैव म्हणजे याच संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणार्‍या आमदारांना दूर ढकलले जाणार असेल तर करायचे तरी काय? उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पाप संजय राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर पक्षाचे शत्रू नव्हे तर आपणच. हे आम्हाला मान्य नाही. म्हणूनच आमचा हा लढा शिवसेनेचा आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या सदिच्छांचे, आशिर्वादाचे बळ आम्हाला लाभते आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शिवसेनेचे व आमचे पक्षनेते उद्धव साहेब यांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा व विद्यमान आघाडी ऐवजी भाजपसोबत युती करावी. महाराष्ट्राच्या जनतेने युती म्हणून निवडून दिलेल्या युतीचे पुनर्जीवन करावे. आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही असंही बंडखोर आमदारांनी स्पष्ट सांगितले आहे. 

Web Title: Eknath Shinde Revolt: Big blast against Sanjay Raut; Serious allegations of rebel Shivsena MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.