शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 04:41 PM2022-06-22T16:41:56+5:302022-06-22T16:52:05+5:30

शिंदे यांनी त्यांच्या समर्थक ३४ शिवसेना आमदारांचे पत्र विधान भवनाला पाठवले आहे. या पत्रात २ ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवलं आहे.

Eknath Shinde Revolt: Letters of Shivsena 34 MLAs of Eknath Shinde group to the Deputy Speaker of the Assembly | शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय?

शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय?

googlenewsNext

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिंदे आणि समर्थक आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात गेल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३४ आमदारांचे पाठबळ असून याबाबत आता त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवल्याने उघड झाले आहे. 

वर्षावरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली. त्यांच्याऐवजी अजय चौधरी यांची नेमणूक केली. त्यानंतर मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून सर्व आमदारांना पत्र पाठवलं. या पत्रात २२ जून संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहावे असा आदेश दिला. त्याचसोबत जर बैठकीस उपस्थित राहिले नाही तर आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याचं गृहित धरून सदस्यत्व अपात्र करण्याची कारवाई केली जाईल म्हटलं. 

शिवसेनेच्या या खेळीवर एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. शिंदे यांनी त्यांच्या समर्थक ३४ शिवसेना आमदारांचे पत्र विधान भवनाला पाठवले आहे. या पत्रात २ ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवलं आहे. त्यात २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. ती यापुढेही कायम राहील असा ठराव आहे. त्याचसोबत मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची निवड करण्यात आल्याचं सांगत सुनील प्रभू यांचं तातडीने मुख्य प्रतोद रद्द केल्याचं सांगण्यात आले आहे. 

या पत्रात काय म्हटलंय?

सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पोलीस बदल्यांमधील घोटाळा, मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यासारखे मंत्री जेलमध्ये असल्याने आमचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावं लागत आहे. त्याचसोबत स्थानिक पातळीवर आमची राजकीय प्रतिमा यामुळे मलिन होत आहे. जे सरकारमध्ये आमच्या सोबत आहेत ते पदाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायेत. आमच्या पक्षाच्या म्हणजेच शिवसेनेला वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या एनसीपी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आपल्या पक्षाचा कट्टर वैचारिक आधार असलेल्या आणि स्थानिक मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या तत्त्वांशी तडजोड झाली आहे. गेली अडीच वर्षे आमचा पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विसंगत विचारसरणीशी जुळवून घेत पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड केली आहे.

आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड न करता दिले होते. परंतु विचारधारेच्या विरोधात जात पक्षाचे नुकसान होत आहे. २०१९ मध्ये भाजपासोबत युती बनवून त्यानंतर विचारधारेच्या विरोधात जात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बनवली. त्याचा नकरात्मक परिणाम मतदार आणि शिवसैनिकांमध्ये झाला. याबाबत पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला लक्षात ठेवता भ्रष्ट कारभाराच्या सरकारमध्ये शिवसेनेलाही टीका सहन करावी लागत आहे.  

Web Title: Eknath Shinde Revolt: Letters of Shivsena 34 MLAs of Eknath Shinde group to the Deputy Speaker of the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.