'एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांवर जादूटोणा केला', चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:31 PM2022-06-27T19:31:35+5:302022-06-27T19:31:54+5:30
Maharashtra political crisis: 'एकनाथ शिंदेंच्या तोंडामध्ये सतत कोणतीतरी पांढरी गोळी असते. त्यांना जादूटोणा येतो.'
Maharashtra political crisis: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, शिंदे यांच्याबद्दल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केला आहे. 'एकनाथ शिंदेंना जादूटोणा येतो, त्यांनी आमदारांवर जादू केली', असे अजब विधान खैरे यांनी केले आहे. वैजापूर येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
एकनाथ शिंदेंसोबत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदार गेले आहेत. यात वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात आज शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत खैरेंनी शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले, 'त्या गुवाहाटीत आमदारांना बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आलाय. कारण, एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून या लोकांना आपलं करुन घेतलंय', असा अजब दावा खैरे यांनी केला.
संजय शिरसाट यांनी बांधली बंडखोरांची ‘मोट’
जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले.